वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग

 


  • काही शब्दसमूहांचा भाषेत वापर करताना त्यांचा नेहमीचा प्रचलित अर्थ न राहता, त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार म्हणतात.
  • वाक्प्रचार म्हणजे विशिष्ट शब्दसमूहांचा मूळ अर्थ (वाच्यार्थ) न राहता रूढीने प्रचलित असणारा वेगळा अर्थबंध होय.

उदाहरणार्थ,
(१) कान धरणे :

वाच्यार्थ : बोटांनी कान पकडणे.
वेगळा अर्थ : माफी मागणे.
वाक्य : आईने चूक समजावून सांगताच महेशने कान धरले.

(२) नाक मुरडणे :
वाच्यार्थ : नाक वाकडे करणे.
वेगळा अर्थ : नाराजी व्यक्त करणे.
वाक्य : शीतलने रूपाचा नटवेपणा बघून नाक मुरडले.

म्हणून, 'कान धरणे' 'नाक मुरडणे' हे वाक्प्रचार आहेत.

 

पुढील वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यांत उपयोग अभ्यासा :

 मनात अढी नसणे  : किल्मिष ठेवणे, मनात डंख न ठेवणे..
वाक्य : स्पष्ट बोलणे झाल्यामुळे रघुरावांच्या मनात मनोहरबद्दल कोणतीही अढी नव्हती.

अवहेलना करणे : अनादर करणे, अपमान करणे.
वाक्य : गुणवान माणसाची अवहेलना करू नये.

अशुभाची सावली पडणे : विपरीत घडणे, अमंगल घडणे.
वाक्य : लग्नानंतर दोन महिन्यांत विधवा झालेल्या सुमनवर जणू अशुभाची सावली पडली.

अंग चोरून घेणे : अंग (भीतीने) आक्सून घेणे.
वाक्य : गर्दीत घुसलेल्या प्रेक्षकांनी अंग चोरून घेतले.

आटोक्यात नसणे - आवाक्याबाहेरचे काम असणे.
वाक्य : आटोक्यात नसलेले काम समीरने अतिशय कष्टाने पूर्ण केले.

आण घेणे - शपथ घेणे.
वाक्य : कधीही दुष्कृत्य करणार नाही, अशी शिवरामने आण घेतली.

आयुष्य गमावणे : जीवन संपवणे.
वाक्य : काही माणसे वाईट व्यसनांनी आपले आयुष्य गमावतात.

आरती  ओवाळणे - खूप कौतुक करणे.
वाक्य : परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या शालिनीच्या यशाची सर्व गाव आरती ओवाळत होता.

  आवाहन करणे : चांगले काम करण्यासाठी बोलावणे.
वाक्य : प्रधानमंत्र्यांनी जनतेला स्वच्छता अभियानासाठी आवाहन केले.

आव्हान देणे : प्रतिस्पर्ध्याला ललकारणे.
वाक्य : भैरू पहिलवानाने केरूला कुस्तीसाठी आव्हान दिले.

उघड्यावर टाकणे : जबाबदारी झटकणे, निराधार करणे.
वाक्य : कर्मचाऱ्यांनी संप करून रस्ता दुरुस्तीचे काम उघड्यावर टाकले.

उपकार फेडणे : कृतज्ञता दाखवणे, उतराई होणे.
वाक्य ज्यांनी ज्यांनी आपणांस मदत केली, त्यांचे उपकार आपण फेडावेत.

उंबरठा ओलांडणे - मर्यादा सोडणे.
वाक्य : आईला वाटेल तसे बोलून कार्तिकने उंबरठा ओलांडला.

कटाक्ष असणे – खास लक्ष असणे, आग्रह असणे.
वाक्य : परीक्षेच्या कालावधीत मोहनचे आरोग्य नीट राहील यावर आईचा कटाक्ष असतो.

कडी करणे - वरचढ ठरणे.
वाक्य : जुना रेकॉर्ड मोडून सरलाने धावण्याच्या शर्यतीत कडी केली.

कपाळावरील कुंकू पुसले जाणे : पतीला मृत्यू येणे, विधवा होणे.
वाक्य : ऐन तारुण्यात मालतीच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले.

 

करी कंकण बांधणे : प्रतिज्ञा करणे, शपथ घेणे.
वाक्य : स्वराज्य स्थापन करण्याचे मावळ्यांनी करी कंकण बांधले.

कस लागणे - गुणवत्ता सिद्ध होणे.
वाक्य : परीक्षेतच विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा कस लागतो.

कंबर बांधणे (कसणे) - दृढ निश्चय करणे.
वाक्य : नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली.

कात टाकणे : जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन स्वरूप धारण करणे.
वाक्य : अंगी असलेल्या खोडकरपणाची कात टाकून अरुणने शिस्तीने वागण्याचे ठरवले.

कानमंत्र देणे- गुप्त सल्ला देणे.
वाक्य : परीक्षेची तयार कशी करावी याचा काकांनी राजेशला कानमंत्र दिला.

✒  काया ओवाळून टाकणे : जीव कुर्बान करणे.
वाक्य : मावळ्यांनी शिवाजी महाराजांवर काया ओवाळून टाकली होती.

कूस धन्य करणे :  जन्म सार्थकी लागणे.
वाक्य : उज्ज्वल यश मिळवून अमरने आईची कूस धन्य केली.

कृतकृत्य होणे - धन्य धन्य होणे.
वाक्य : मुलाला नोकरी लागलेली पाहून रमाबाई कृतकृत्य झाल्या.

कृतघ्न होणे - उपकार विसरणे.
वाक्य : सुरेशला मदत करणाऱ्यांशीच तो कृतघ्न झाला.

कृतज्ञ असणे - उपकाराची जाणीव असणे.
वाक्य : सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांबद्दल जनतेने कृतज्ञ असले पाहिजे.

कोलमडून पडणे - मनाने ढासळणे.
वाक्य : अवेळी आलेल्या पावसाने पिकांची नासाडी झालेली पाहून शेतकरी कोलमडून गेले.

खांदे पाडणे - निराश होणे, दीनवाणे होणे.
वाक्य : विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत नसल्यामुळे मधूने खांदे पाडले.

खोडा घालणे - संकटे निर्माण करणे, विघ्न आणणे.
वाक्य : गावात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पाला काही माणसांनी खोडा घातला.

ख्याती मिळवणे : नाव कमावणे, प्रसिद्ध होणे.
वाक्य : सतत पाच वर्षे शंभर टक्के निकाल लावून आदर्श विदयालयाने ख्याती मिळवली.

गाजावाजा होणे : प्रसिद्धी होणे.
वाक्य : महाराष्ट्र केसरी किताब मिळवल्यामुळे सुधीरचा जिल्ह्यात गाजावाजा झाला.

गुण गाणे : स्तुती करणे,
वाक्य : आई आपल्या लहानग्या सरिताचे नेहमी गुण गाते.

धाम गाळणे : खूप कष्ट करणे,
वाक्य : शेतकरी आपल्या शेतामध्ये दिवस-रात्र घाम गाळतात.

चार पैसे गाठीला बांधणे : पैशांची बचत करणे.
वाक्य : शहरात राब राब राबून रामभाऊंनी गावी असलेल्या कुटुंबासाठी चार पैसे गाठीला बांधले.

चारी मुंड्या चीत करणे : पूर्ण पराभव करणे.
वाक्य : भैरू पहिलवानाने कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या चीत केले.

चूर होणे : मग्न होणे, गुंगणे,
वाक्य : समोरचे अप्रतिम निसर्गदृश्य बघण्यात मुले चूर झाली.

✒  चेहरा पांढरा फटफटीत पडणे : चेहऱ्यावर भीती पसरणे.
वाक्य : पोलिसांना समोर पाहताच चोराचा चेहरा पांढरा फटफटीत पडला.

✒  चोख असणे : व्यवस्थित असणे.
वाक्य : व्यावसायिकाने आपल्या व्यवसायात अत्यंत चोख असायला हवे.

✒  जप करणे : एकच बाब पुन्हा पुन्हा बोलणे.
वाक्य : आपले जीवन सुधारणाऱ्या गुरूंचा महेश सतत जप करीत असतो

✒  जवळीक साधणे : सलगी निर्माण करणे.
वाक्य : सुरेशची हुशारी पाहून रमेशने त्याच्याशी सलगी साधली.

✒  जिवाचा कान करणे : मन लावून ऐकणे.
वाक्य : पाहुण्यांचे भाषण विद्यार्थी जिवाचा कान करून ऐकत होते.

✒  जिवाची उलघाल होणे : मनाची तगमग होणे.
वाक्य : सहलीला जायला न मिळाल्यामुळे रमाच्या जिवाची उलघाल होत होती.

✒  जीव तोडून काम करणे : पराकोटीचे कष्ट करणे.
वाक्य : शेतकरी शेतात चांगले पीक येण्यासाठी दिवसरात्र जीव तोडून काम करतो.

✒  ज्योत तेवत ठेवणे : चांगले प्रयत्न सतत सुरू ठेवणे.
वाक्य : प्रत्येकाने पराकोटीच्या प्रयत्नांची ज्योत तेवत ठेवली पाहिजे.

✒  टकळी चालणे : एकसारखी बडबड करणे.
वाक्य : गावावरून आल्यापासून आजीची सारखी टकळी चालली होती.

टाकून बोलणे : आडवे-तिडवे बोलणे, अपमानित करणारे शब्द बोलणे.
वाक्य : नम्रता येता-जाता सुशीलाला टाकून बोलते.

डोळ्यातले अश्रू पुसणे : दुःख दूर करणे.
वाक्य : मदर तेरेसा यांनी गरिबांच्या डोळ्यांतले अभू पुसले,

डोळे पाणावणे : रडू येणे.
वाक्य : राधा सासरी निघाल्यामुळे आईचे डोळे पाणावले.

डोळे भरून येणे : डोळ्यात अश्रू दाटणे
वाक्य : मुलाचे यश पाहून आनंदाने यशोदाबाईचे डोळे भरून आले.

तकार करणे – गाऱ्हाणे मांडणे,
वाक्य : सदाशिवरावांनी परिसरातील अस्वच्छतेविषयी आरोग्य खात्याकडे तक्रार केली.

तडजोड करणे - समझोता करणे.
वाक्य : माधवने नाइलाजाने स्वत: च्या तत्त्वाशी तडजोड केली.

✒  तंद्री लागणे : गुंग होणे.
वाक्य:  गाणे म्हणताना राधाची तंद्री लागते.

✒  तारेवरची कसरत करणे : एकाच वेळी अनेक कामे सांभाळणे.
वाक्य : मोलकरीण रजेवर असल्यामुळे राधिकाला तारेवरची कसरत करावी लागत होती.

ताव मारणे : पोटभर खाणे.
वाक्य : स्वातीच्या लग्नात सुधाकरने जिलेबीवर यथेच्छ ताव मारला.

तोंड उघडणे :  थोडेसे बोलणे.
वाक्य : खोदून खोदून विचारल्यावर अखेर आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध सदाशिवने तोंड उघडले.

दम धरणे - धीर धरणे.
वाक्य : उत्तुंग यशासाठी माणसाने दम धरला पाहिजे.

दम निघून जाणे : धीर सुटणे, हतबल होणे.
वाक्य : नदीला आलेल्या पुराचा सामना करता करता गावकऱ्यांचा दम निघून गेला.

✒  दुःखाची किंकाळी फोडणे :  खूप दुःख व्यक्त करणे, दुःख अनावर होणे.
वाक्य : तरुण मुलगा निवर्तल्याची वार्ता ऐकून आईने दुःखाची किंकाळी फोडली.

✒  दुरावत जाणे : लांब जाणे.
 वाक्य : आजची पिढी भावनिक गोष्टींपासून दुरावत चालली आहे.

✒  धूम ठोकणे : जोरात पळून जाणे.
वाक्य : पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी धूम ठोकली.

नजर खिळून राहणे : एकाग्रतेने पाहत राहणे.
वाक्य : प्रदर्शनातील सुंदर चित्रांवर प्रेक्षकांची नजर खिळून राहिली.

नजर लागणे : काहीतरी वाईट घडने, विघ्न येणे.
वाक्य : नवीन इमारत कोसळली, तेव्हा राधाबाईंना वाटले, कुणाची तरी नजर लागली.

नवी पालवी फुटणे : नवे स्वरूप मिळणे
वाक्य : या कंपनीत आपल्याला जरूर नोकरी मिळेल. या आशेने चंद्रकांतच्या मनात नवी पालवी फुटली.

नाचक्की होणे : अबू जाणे, बदनामी होने.
वाक्य : परीक्षेत नापास होऊन मनूने स्वतःची नाचक्की करून घेतली.

नाळ तुटणे : संबंध दुरावणे.
वाक्य : ज्या माणसांनी आपल्या सहकार्य केलेले असते, त्यांच्याशी कधी तोडू नये

निरोप देणे - जाण्यासाठी परवानगी देणे.
वाक्य : गावाला जायला निघालेल्या आजीला बाबांनी आनंदाने निरोप दिला.

निंदा करणे : एखाद्याच्या पश्चात वाईट बोलणे.
वाक्य :  कुणाचीही निंदा करणे हे गैर कृत्य आहे.

पदार्पण करणे : (कोणत्याही क्षेत्रात / कोणत्याही बाबतीत) पहिले पाऊल टाकणे.
वाक्य : शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने रंगमंचावर पदार्पण केले.

पर्वणी असणे : आनंददायी गोष्ट असणे.
वाक्य : गावची जत्रा म्हणजे गावकऱ्यांना आनंदाची पर्वणी असते.

पळता भुई थोडी होणे - फजिती होणे..
वाक्य : महाराजांनी हल्ला करताच मोगल सैन्याची पळता भुई थोडी झाली,

पाठ थोपटणे- शाबासकी देणे.
वाक्य : वर्गात पहिल्या नंबरने पास झालेल्या प्रभाकरची सरांनी पाठ थोपटली.

पाठीशी उभे राहणे : आधार होणे, धीर देणे,
वाक्य : भर संकटात बापू हा रामूच्या पाठीशी उभा राहिला.

पापांचा घडा भरणे : सर्वनाशाचा क्षण जवळ येणे.
वाक्य : भुरट्या चोऱ्या करणाऱ्या रामूने आपल्या मालकाच्या घरची तिजोरी फोडली, तेव्हा त्याच्या पापांचा घडा भरला.

पिकले पान गळणे - मृत्यू पावणे.
वाक्य : वयाच्या नव्वदाव्या वर्षी अखेर रामभाऊंचे पिकले पान गळले.

✒  पुनर्जीवित करणे : बंद पडलेले कार्य पुन्हा सुरू करणे,
वाक्य : गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सरकारने पुनर्जीवित केले.

प्रशंसा करणे : स्तुती करणे.
वाक्य : चित्रकलेत प्रथम आलेल्या शीतलची मुख्याध्यापकांनी भरपूर प्रशंसा केली.

प्रेरणा देणे- स्फूर्ती देणे.
वाक्य : सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला क्रिकेटची प्रेरणा दिली.

बचत करणे - काटकसर करणे.
वाक्य : मासिक पगारातून उदयने नेहमी थोड्या पैशांची बचत केली होती.

बेगमी करणे - भविष्यासाठी संग्रह करणे.
वाक्य : उद्योगी मुंग्या कण कण गोळा करून पावसाळ्यासाठी बेगमी करतात.

भडाभडा बोलणे - मनात साचलेले एकदम बोलणे.
वाक्य : आपले दुःख रमाबाई भडाभडा बोलून टाकतात.

भविष्याचा वेध घेणे - पुढच्या काळाचा अंदाज बांधणे.
वाक्य : तंत्रज्ञानात प्रगती करून शास्त्रज्ञांनी भविष्याचा वेध घेतला.

भान हरपणे – मग्न होणे.
वाक्य : सनसेट पॉइंटवर मुले भान हरपून सूर्यास्त पाहत होती.

भेदरून जाणे - घाबरणे.
वाक्य अचानक संकट कोसळल्यामुळे महादू अगदी भेदरून गेला...

भ्रांत असणे - विवेचना (काळजी असणे.
वाक्य : हातावर पोट असणाऱ्या मजुरांना उदद्याची प्रांत असते.

मात करणे - विजयी होणे.
वाक्य - टी-२० च्या फायनलमध्ये भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर मात केली,

मातीचे देणे फेडणे - मातृभूमीचे उपकार फेडणे.
वाक्य : आपण ज्या भूमीत जन्म घेतला त्या मातीचे देणे फेडायला हवे.

मातीला मिळणे - नाश होणे, विध्वंस होणे.
वाक्य : माणसाचा देह नश्वर आहे. शेवटी तो मातीला मिळतो.

मानवंदना देणे - आदरपूर्वक सन्मान करणे,
वाक्य : स्वातंत्र्यदिनी विदद्यालयातील सर्व विदयार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

मुखर करणे - भावना शब्दांत व्यक्त करणे.
वाक्य : आपल्या मनात उमटलेल्या भावना नेहमी कागदावर मुखर कराव्यात.

मुद्रा उमटणे : ठसा उमटणे.
वाक्य : मितालीने पोहण्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवून स्पर्धेमध्ये स्वतःची मुद्रा उमटवली.

रया जाणे - मूळ रुबाब निघून जाणे.
वाक्य : शंभर वर्षांनंतर इनामदारांच्या वाड्याची रया गेली.

रंगात येणे - तल्लीन होणे, आनंदाने गुंग होणे.
वाक्य : नाटकातील भूमिका करताना नीलेश अगदी रंगात आला.

ऱ्हास होणे - नाश होणे.
वाक्य : जुन्या बुरसटलेल्या रुढींचा -हास होणे आवश्यक आहे.

लुप्त होणे - नाहीसे होणे.
वाक्य : सूर्यप्रकाश पसरताच नदीवर पडलेले धुके लुप्त झाले.

वठणीवर आणणे - योग्य मार्ग दाखवणे.
वाक्य : कानउघडणी करून रामरावांनी महादूला वठणीवर आणले,

वाखाणणी करणे - प्रशंसा करणे.
वाक्य : वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या आलेल्या गणेशची मॅडमनी वर्गात वाखाणणी केली.

शिंग फुंकणे - लढा देण्यास सुरुवात करणे.
वाक्य : पारतंत्र्याविरुद्ध उठाव करण्यासाठी क्रांतिवीरांनी शिंग फुंकले.

संजीवनी मिळणे - जीवदान देणे.
वाक्य : सरकारच्या निर्णयामुळे जुन्या सामाजिक हिताच्या योजनांना संजीवनी मिळाली.

संसार फुलणे- संसारात सुखसमृद्धी येणे.
वाक्य : मुले नोकरीला लागल्यावर सीताबाईंचा संसार फुलला.

स्वप्न साकार करणे - स्वप्न प्रत्यक्षात येणे,
वाक्य : भारतीय क्रिकेट संघाने वन-डेमध्ये विश्वविजेते होण्याचे स्वप्न साकार केले.

स्तिमित होणे - थक्क होणे, आश्चर्यचकित होणे,
वाक्य : दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्तिमित झाले.

हद्दपार होणे - सीमेबाहेर जाणे (जीवनातून निघून जाणे).
वाक्य : मालकाशी बेइमानी केल्यामुळे लज्जित होऊन पिकू गावातून हद्दपार झाला.

 


  • TAGS
  • MARATHI VAKPRACHAR ARTH ANI VAKYAT UPYOG
  • MARATHI VAKPRACHAR ARTH VAKYAT UPYOG
  • VAKPRACHAR ARTH ANI VAKYAT UPYOG
  • VAKPRACHAR ARTH MARATHI
  • VAKPRACHAR ARTH VAAKYAAT UPYOG
  • VAKPRACHAR ARTH VAKYAT UPYOG MARATHI
  • VAKPRACHAR IN MARATHI ARTH VAKYAT UPYOG
  • VAKPRACHAR V ARTH
  • VAKPRACHAR VA TYACHE ARTH
  • उकल होणे वाक्प्रचार अर्थ व वाक्यात उपयोग
  • मराठी वाक्प्रचार अर्थ व वाक्यात उपयोग
  • मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ इयत्ता दहावी
  • वाक्प्रचार अर्थ व वाक्यात उपयोग
  • वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 100
  • वाक्यप्रचार मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग
Previous Post Next Post