कवितेचे रसग्रहण...करताना
इयत्ता ९ वी व १० वी मराठी भाषेच्या पदयविभागाचे मूल्यमापन करताना कवितेतील (काही) पदयपंक्तींचे रसग्रहण करा अशी कृती आहे. कुमारभारती व अक्षरभारती (प्रथमभाषा व द्वितीय भाषा) या पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट असलेल्या काही कवितांची रसग्रहणे तुम्ही वाचली आहेत. आता कृतिपत्रिकेच्या दृष्टीने रसग्रहणाचा अभ्यास कसा करावा? पद्य पंक्तीचे रसग्रहण कसे करायचे? याबाबत तुम्हाला दिशा या लेखातून नक्की मिळेल.
उत्कट भावनेच्या उत्स्फूर्त उद्गारातून कविता जन्मास येते. सूचक अर्थगर्भ, सहजसुंदर शब्दांची रचना, अल्पाक्षरत्त्व व अर्थघनत्व ही उत्तम काव्याची वैशिष्ट्ये आहेत.
कविता छंदोबद्ध वृत्त, अलंकार यांनी
युक्त असेलच असे नाही. अशा बंधनमुक्त म्हणजे मुक्त छंदातील कवितांमध्येही वरील
वैशिष्ट्ये प्रामुख्याने आढळतात.
काही कविता ह्या गेय ( रागदारीत बसवता येतील)
अशा नसल्या तरी त्यांना अंगभूत लय असते; म्हणूनच काव्यगायनाइतके काव्यवाचनही
रसिकांच्या मनाला मोहून टाकते. अशी कविताही रसिकांच्या मनात घर करते. शब्दप्रधानता,
अर्थप्रधानता
ही अशा कवितेची बलस्थाने असतात.
प्रत्येक कवितेला भावसौंदर्य, अर्थसौंदर्य, भाषासौंदर्य, विचारसौंदर्य असते. स्वतःची स्वतंत्र भाषा असते. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये समजून घेणे, त्या कवितेचे अर्थ, भाव, विचारसौंदर्य उलगडणे म्हणजे कवितेचा आस्वाद घेणे. कलाकृती अभ्यासताना त्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला तरच ती आनंददायी ठरते. एखादी कलाकृती दिसणे, पाहणे व ती अनुभवणे हे तिच्या आस्वादाचे टप्पे आहेत. कवितेला नेहमी तीन अर्थ असतात.
वाच्यार्थ -एक कविता वाचल्याबरोबर कळतो, तो ( सहज समजणारा / लागणारा / प्रतीत होणारा अर्थ). भावार्थ - कवितेमधून सूचित होणारा (Between the line) अर्थ. मथितार्थ - कवीच्या / कवयित्रीच्या मनात असलेला त्यांना सुचवायचा असा अर्थ ( मथितार्थं म्हणजे कवितेच्या शब्दांचा अर्थाच्या विचारातून, मंथनातून जाणवलेला अर्थ). |
---|
कवितेचे हे तीन
अर्थ समजण्यासाठी खालील उदाहरण पाहूया. कवयित्री आसावरी काकडे यांची 'लाहो'
या
संग्रहातील कविता 'खोद आणखी थोडेसे' इ. १० वीच्या
कुमारभारती या पाठ्यपुस्तकात आहे
समीक्षा व रसग्रहण यातील फरक समजून घेऊया…
समीक्षा ही रसग्रहणानंतरची पातळी असते.. समीक्षा म्हणजे त्या कवितेतील सर्व सूक्ष्म भाव / आशय व्यक्त करताना कवींच्या मनाचे, विचारांचे जे प्रतिबिंब पडते, त्यातील बारकावे समजून घेणे, त्यातील न्यूनता निदर्शनास आणून देणे व कवितेतील उत्तमतेबरोबर समीक्षकाला स्वतःला खटकणाऱ्या बाबीही परखडपणे नमूद करणे हे समीक्षेत अपेक्षित असते.समीक्षा म्हणजे टीका नव्हे. एखादी गोष्ट आवडली किंवा नाही हे सांगताना ढोबळमानाने लेबल न लावता आपले मत पटवून देता येणे महत्त्वाचे असते. समीक्षा म्हणजे कलाकृतीचा चिकित्सकपणे अभ्यास करून दिलेला अभिप्राय असावा. मुख्य म्हणजे असा स्व- अभिप्राय देतानाही त्यात केवळ आत्मनिष्ठ विचार केलेला नसावा तर कलाकृतीतील उत्तमतेला दादही दिलेली असणे महत्त्वाचे आहे.
काव्यसौंदर्य ही संकल्पना समजून घेऊया...
काव्यसौंदर्य अभिव्यक्ती म्हणजे कवितेच्या
वाचनाने अथवा श्रवणाने मनावर झालेल्या संस्कारांना शब्दरूप देणे होय. काव्यसौंदर्यामध्ये
विचारसौंदर्य आशयसौंदर्य, अर्थसौंदर्य आणि भावसौंदर्य यांचा
समावेश असतो. कोणतीही कविता / कलाकृती वाचल्यावर, पाहिल्यावर
त्यातील या सौंदर्याची जाणीव होते. कवीची मूळ संकल्पना, भावना, विचार,
भाषाशैली,
शब्दांची
विशिष्ट रचना, मांडणी, त्यात योजलेले
शब्दालंकार, अर्थालंकार, वृत्तरचना व
सर्वांबरोबर कवीने काव्यात प्रतिभा व कल्पनेला शब्दरूप देऊन निर्माण केलेली
काव्यसृष्टी या सर्वांचा एकत्रित परिणाम काव्यसौंदर्यात अंतर्भूत असतो. तो उलगडून
दाखवणे व कविता आपल्याला भावणे वा न भावणे हे समर्पक शब्दांत सकारण कथन करणे
म्हणजे काव्यसौंदर्य जाणणे होय.
अर्थात प्रत्येक कवितेला तिच्या प्रत्येक ओळीला वरील सर्व घटकांच्या चौकटीत गुंफण्याचा प्रयत्न करणे शक्य नसते. काही कविता वृत्तबद्ध असतील तर काही मुक्तछंदातील असतील. तसेच एखादी कविता ही पूर्णपणे भावकविता असेल तर एखादी विचारप्रधान असेल. निसर्ग कविता मनाला तृप्त करते. परंतु तिच्यातून एखादा विचार प्रकट होईलच असे नाही. उदा. 'श्रावणमासी' (कवी बालकवी इ. ७ वी) ही कविता निसर्गकविता आहे, तर 'आश्वासक चित्र' (कवयित्री नीरजा - - इ. १० वी) ही कविता 'स्त्रीपुरुष समानता' हा मूल्यविचार प्रकट करणारी आशावादी कविता आहे. 'वस्तू' (कवी द. भा. धामणस्कर इ. १० वी) ही कविता निर्जीव वस्तूंवरही प्रेम करायला शिकवणारी संवेदनशील कविता आहे. 'माणस पेरायला लागू' ही वीरा राठोड यांची सामाजिक विचारप्रधान कविता आहे.
इयत्ता १० वीच्या अक्षरभारती या पाठ्यपुस्तकातील देशभक्ती, देशप्रेमाचा धडा देणारी 'निरोप' ही कविता संवेदनशीलतेबरोबर सैनिक, समाज, देश यांच्याबाबत असलेले समाजभान जागृत करणारी सामाजिक कविता आहे.
कवितेचा आशय आणि भाषासौंदर्याचा एकत्रित अनुभव रसग्रहणात स्वशब्दांत मांडणे महत्त्वाचे असते. संपूर्ण कवितेऐवजी कवितेतील 'काही ओळींचे रसग्रहण करा' अशी सूचना असली तरी तेही वरील मुद्द्यांना धरूनच करायला हवे. अशी कृती इ. ९ वी १० वीला अपेक्षित आहे. संपूर्ण कवितेचे रसग्रहण करा अशी कृती अपेक्षित नाही, ती पुढील स्तरावर कवितेचा स्वतंत्र अभ्यास करताना व काव्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही विचारात घ्यालच. अर्थात प्रत्येक ओळीच्या बाबतीत प्रत्येकच / सगळेच मुद्दे लागू पडतील असे नाही. कृतिपत्रिकेत दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करताना त्या काव्यपंक्तीचे काव्यसौंदर्य उलगडून दाखवणे व कवितेचा आपल्या मनावर झालेला एकसंध परिणाम स्वशब्दांत मांडणे महत्त्वाचे.
इ. ९ वी, इ. १० वीच्या स्तरावर रसग्रहणाचा विचार करताना किंवा अभ्यास करताना तो खालील मुद्द्यांनुसार करावा.
आशयसौंदर्य (कवितेचे बाह्यांग)
२. कवीचे / कवयित्रीचे नाव
३. कवितेचा संदर्भ ग्रंथ (काव्यसंग्रह)
४. कवितेचा रचनाप्रकार (काव्यप्रकार )
५. कवितेची भाषा
६. भाषाशैली कवितेची भाषिक वैशिष्ट्ये
१. कवीची भाषाशैली (ग्रामीणभाषा, बोलीभाषा,संवादात्मक
भाषा, निवेदनात्मक भाषा, चित्रदर्शी भाषा)
२.कवितेत आलेले शब्दालंकार, अर्थालंकार
३. वृत्त / छंद
४. कवितेची आंतरिक लय / नादमाधुर्य कवितेचे अर्थसौंदर्य, भावसौंदर्य,
विचारसौंदर्य,काव्यसौंदर्य
२. व्यक्त होणारा भाव / विचार
३. कवितेतून व्यक्त झालेले विचार (सामाजिक) भान / निसर्ग वर्णन )
४. कवितेचा वाच्यार्थ / भावार्थ / मथितार्थ कवयित्रीला / कवीला अभिप्रेत असलेला विचार
५. कवितेतून मिळणारा संदेश / मूल्य / उपदेश
६. आशयाला पुढे नेणारा विषय, त्यासाठी चपखल शब्दांचा वापर
७.अर्थच्छटा / अर्थाच्या विविध छटा.
८. भावनांचा आविष्कार
९. संवेदनशीलता, रस, कल्पना, प्रतिमा, प्रतिमान, मिथक यांचा सुयोग्य वापर
पाठ्यपुस्तकातील प्रत्येक कवितेचा वरील मुद्दे विचारात घेऊन एक तक्ता करून ठेवावा. तो जाता येता समजून घेतला, तर पदद्यविभागातील कृती सोडविणे अत्यंत सोपे व पूर्ण गुण मिळवून देणारे ठरेल.
वरील सर्व मुद्यांमध्ये केवळ आपल्या मनावर
झालेला कवितेचा / दिलेल्या पद्य पंक्तीचा एकत्रित परिणाम (म्हणजेच कविता आवडण्याची
वा न आवडण्याची कारणे ) सकारण मांडता आले की रसग्रहणाचेही गुण मिळणे नक्कीच सुलभ
होईल. या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला केवळ पाठ्यपुस्तकातीलच नव्हे तर
कोणतीही कविता वाचताना खरा काव्यानंद घेता येईल.
रसग्रहण या घटकाचा संपूर्ण अभ्यास तुमच्यासाठी आनंददायी तर ठरेलच, परंतु कोणत्याही काव्याचा / कलाकृतीचा आनंद घेण्यास तुम्हाला सक्षम बनवेल.
काव्यानंदात डुंबणे म्हणजे सृजनशील प्रतिभेने, कल्पनेने नटलेल्या या दुसऱ्या दुनियेची सफर करणे होय. तुम्हाला काव्यातील या दुसऱ्या रम्य दुनियेची सफर करण्याचा आनंद देणे व तो मिळविण्यासाठी सक्षम बनविणे हाच खरा उद्देश आहे.
Post a Comment