Header Ads

'मनक्या पेरेन लागा' कवितेचे रसग्रहण_ वीरा राठोड


'मनक्या पेरेन लागाही कवी वीरा राठोड यांची मूळ बंजारा भाषेतील कविता इयत्ता १०वीच्या प्रथमभाषेच्या (कुमारभारती) पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली आहे. कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे पाठ्यपुस्तकातून बोलीभाषेचा परिचय या उद्दिष्टाबरोबर 'माणसं पेरा माणुसकी उगवेलहे मूल्य सुचवणारी ही कविता आहे. प्रचलीत मराठी भाषेत याच कवितेचे भाषांतर केलेली माणसं पेरायला लागू ही विनायक पवार यांची कविताही मुद्दाम शेजारी छापली आहे. या मूळ कवितेचा हा रसास्वाद स्वत: कवीच्या शब्दांत....


काळ कोणताही का असेना परिस्थितीच माणसाला झगडायला आणि सिद्ध व्हायला लावत असते, असे काळाच्या पटलावर आजवर अनेकवार घडून गेलेले आहे. परिस्थितीसमोर झुकणे हे शौर्याचे लक्षण नसते तर परिस्थितीला वश करून काळाच्या भाळावर मुद्रा उमटवणाऱ्याला जग स्मरणात ठेवत असते. अशाच अगणित माणसांनी जे पराक्रम घडवलेले असतात ते त्यांच्या एकट्याचे नसतात तर त्यांनी आपल्यासोबत उभ्या केलेल्या अगणित माणसांचे असतात. त्या सर्वांनी भविष्याकरिता सक्षम माणसं जर निर्माण केली नसती तर माणसांचा हा देदीप्यमान वारसा पुढे आला असता का ही शंका आहे. एकूणच काय तर प्रत्येक काळात माणसं जपावी लागतात. माणसं घडवावी लागतात. याचीच ही वेगळ्या रूपातली गोष्ट म्हणजे 'मनक्या पेरेन लागा' (माणसं पेरायला लागू). या कवितेच्या निर्मिती बीजात माझं वैयक्तिक जीवन, माझ्या समकाळातील अवतीभोवतीचे सामाजिक पर्यावरण आणि समोर आलेल्या परिस्थितीशी झगडा करीत सिद्ध होत जाण्याची ही कथा म्हणता येईल. माझी अवधी जडणघडणच ही डोंगराच्या कडेकपारीत, लमाण तांड्यावरची निसर्गाच्या सान्निध्यात झालेली. निसर्गाचे लोभस आणि भयकारी रूपही मी अनुभवले आहे. भाजून काढणारा उन्हाळा सोसला, तसा रक्त गोठवून टाकणारा हिवाळा, आणि छपरापासून घेतले डोळ्यांना गळती लावणारे पावसाळे मुरवून मनात, शरीरात. या ऋतुंनी जगण्याची शाळाच बनवून टाकली. बाप शेतकरी कधीच न थकणारा, कधीच निराश न होणारा, सदैव आशावादी. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची त्याची जिद्द. तो दरवेळी उगवण्यासाठीच पेरत जातो. त्याची ही धडपडण्याची गाथा मी जवळून बघितलेली. पेरलेल पीक बाळश्यातच जळताना अनेकदा पाहिलेलं. पण बाप नव्या उमेदीनं दुबार, तिबार पेरायचा. शेर, पसा, पायली, पासरी जे काही पिकल त्यावर समाधान मानून सालोनबाद न चुकता शेतीची मशागत करून पेरत राहिला. हे मी नकळत्या वयापासून बघत आलेलो. संघर्ष काय असतो हे जसे शेतकरी असलेल्या बापाने शिकवले तसेच झाडा पाखरांनीही मनावर गोंदवून टाकले, जसे झाडाचा बुंधा वाळून गेला तरी मुळ्या कोंब धरतात आणि प्रत्येक ऋतूत मोठ्या कष्टाने पाखरं घरटी बांधतात. ते पावसात, वान्यावावधानात मोडून पडलं तरी पाखर निराश न होता पुन्हा नव्याने घरटं बांधून घेतात. या संपूर्ण निरीक्षणात्मक अनुभवातून जगण्याची भक्कम अशी हिंमत बांधून घेता आली. पण आयुष्य आपली परीक्षा घेण्याचे सोडत नाही. शेतात राबत, गुरं राखत शिक्षण घेत होतो तेव्हा बारावीला नापास झालो आणि दोन वर्षे सहामाही परीक्षेच्या वाऱ्या कराव्या लागल्या. याच काळात मी काहीसा खचून गेलो होतो. उन्हाळ्यात गुरं राखत वैरान झळाईच्या रानात आजोबाने लावलेल्या आंब्याच्या झाडाखाली निराश होऊन बसलेलो असताना लहान-मोठ्या झाडांना निरखून बघताना सुचलेली ही कविता आहे.
       खरं तर 'माणसं पेरायला लागू' ही कविता मी स्वतःला बळ देण्यासाठी लिहिली होती. स्वतःच्या गोंधळलेल्या, निराश मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता ती माझ्याबरोबरच समष्टीची झालेली आहे. तेव्हा मला कळून चुकलं होतं, संघर्ष काही केवळ आपल्याच वाट्याला आलेला नाही तर प्रत्येकाला संघर्षाच्या वाटेवरून जावेच लागते, मग तो सृष्टीतला कुठलाही जीव असो, माणूस असो, पक्षी असो, प्राणी असो, कीटक असो वा वृक्षवेली सर्वांच्या वाट्याला संघर्षरत जगणे आलेले असते. या अनुभवातून मी एका बियाचं झाड होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास अनुभवत होतो. जसं व्यक्तीचं सामान्यातून असामान्य होणं सोपं नसतं. तसंच एका बियाचं झाड होण्यापर्यंतचा प्रवास हा काही सोपा नसतो, सहज नसतो. बी मातीत पडतं. अरेच दिवस ते तसंच पडून राहतं जेव्हा त्याला पाण्याचा शिडकावा मिळतो. त्या तेवढ्याशा आशेवर बी उगवून येतं, ही उर्मी असते त्याच्या ठायीची जशी माता बाळाला जन्म देते, संगोपन करते तसेच मातीही रोपट्याला जन्म देते, संगोपन करते. त्याची मुळं धरून ठेवते, त्याला जीव पुरवते. या प्रवासात माती आणि बी एक-दुसन्याला स्वीकारून घेतात. सर्व संकटांवर मात करण्याची हमी देतात, हेही मी बघितलंय.. बहुधा सर्वांनीच अनुभवलंय, की हेच छोटस बी जेव्हा कोंब धरून वाढत वाढत विशाल झाडाचं रूप घेतं. या प्रवासात बऱ्याचदा ते वायवावधानात मोडून पडलं किंवा कोणी त्याला तोडून टाकतं, बऱ्याचदा जंगलाला लागलेल्या वणव्यात जळून जातं तरीही त्याला अंकुर फुटतो. चिवटपणे ते पुन्हा झेपावतं. काही वर्षांत से डेरेदार वृक्ष बनतं. फुलतं, फळतं, डोलत, पक्षी त्याच्यावर घरटी बांधतात. थकले -भागलेले जीव त्याच्या सावलीत विसावतात. हेही मी बघितलेल होतं. झाड ऊन, वारा, पावसात आनंदाने डोलत असतं. कसलीही तक्रार न करता. एवढंच नाही तर हजार बिया मातीला देऊन टाकतं. पाखरं या बिया रानात नेऊन टाकतात. ही लावलेली, जपलेली झाडं अनेक पिढ्यांपर्यंत साथ देत असतात. ही जशी झाडं आणि मातीची कहाणी आहे. तशीच माणसं आणि सृष्टीच्या नात्याचीही गोष्ट आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. चांगली माणसं आयुष्यभर स्नेह देत राहतात. माणुसकी जपत असतात. अशी माणसं जोडली, जपली पाहिजेत. कारण आज जगण्यातली माणुसकी हरवत चालली आहे. माणूसपण संपत चाललेल्या काळात माणुसकी रुजवणे महत्त्वाचे बनले आहे. माणूसपणाची जाण निर्माण व्हायला हवी. अनेकांनी आपल्याला जपलेलं असतं, जीव लावलेला असतो. त्याला उतराई होण्यासाठी बियाचं रूपक वापरून माणसं पेरण्याची गोष्ट मला या कवितेतून सांगायची आहे. चांगल्याची अपेक्षा करताना आपल्यालाही चांगला माणूस होता आलं पाहिजे आणि जगण्याच्या प्रवासात अशी माणसं सांभाळताही आली पाहिजेत, असं माणूसपण आपल्यासह प्रत्येकात निर्माण झालं पाहिजे. ही शिकवण मला ताठ मानेने उभ्या असलेल्या आणि वाऱ्याच्या हातात अदबीने वाकून हात देणाऱ्या झाडांनी दिलीय. जसे एका बियाच्या हजार बिया होतात तसंच एक चांगला माणूस घडल्यास तो माणसांच्या पिढ्या घडवीत असतो.
    खडतर प्रवासात मातीला मेहनतीचे फळ मिळते. तसे आपल्याला, समाजाला चांगली माणसं जपण्याचे फळ नक्कीच मिळत असते. आपण चांगलं बनून चांगली माणसं जोडली तर अवघं जग नक्कीच चांगलं बनेल. म्हणून चांगली माणसं पेरली पाहिजेत. माणूस पेरला की माणुसकी उगवेल, असा दृढ विश्वास आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करूयात आणि अशा प्रयत्नांनाच शेवटी फळं येत असतात. हीच कहाणी इथे या कवितेत संक्षेपाने सांगितली आहे.

TAGS 10TH MARATHI MANKYA PEREN LAGA SWADHYAY MANKYA PEREN LAGA MANKYA PEREN LAGA KAVITA RASGRHAN MANKYA PEREN LAGA KAVITA SWADHYAY मनक्या पेरेन लागा मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय


No comments

If you have any doubts,Please let me know